ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्याचा हाहाकार माजला होता. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केले आहे. मात्र, संपूर्ण कर्जमाफी आणि ओला दुष्काळ याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. यावरून आता राजकारण आणखी तीव्र होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित हंबरडा मोर्चातून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेत जोरदार प्रहार केला. पॅकेज पाहिल्यावर सगळ्यांना असं वाटलं की इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज आहे. पण नाही ही इतिहासातली सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत इतकी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारलेली नाही. इतकी मोठी थाप देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारलेली आहे, असा जोरदार निशाणा उद्धव ठाकरे यांनी लगावला.

या मोर्चात मोठ्या प्रमाणावर पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. सरकारने जाहीर केलेले पॅकेज शेतकऱ्यांना अमान्य आहे. सरकारचे पॅकेज ही मोठी थाप असून स्वतःचीच पाठ खाजवून घेत आहेत, थोपटून घेत आहेत, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केला. सरकार कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत या सरकारला आम्ही सोडणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांनी सरकारकडे हेक्टरी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. पण पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागत आहोत तर 50 खोके ज्यांनी घेतले आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. हे सहजासहजी वठणीवर येणार नाहीत. तुम्हाला चाबूक हातात घ्यावा लागेल आणि यांना बरोबर वठणीवर आणावे लागेल. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!