मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून अनेक नेते व पदाधिकारी राज्यातील दौऱ्यावर येत असतांना भाजप व ठाकरे गटात मात्र अद्याप आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. नुकतेच ठाकरे या आडनावाला न शोभणारी भाषा आज उद्धव ठाकरे यांनी केली, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच त्यांचे मानसिक संतुलन का बिघडले आहे याचा शोध घ्यावा लागेल असेही ते म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्यावरून सध्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली आहे. यावरूनच प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
प्रसाद लाड म्हणाले, ”ठाकरे आडनावाला न शोभणारी भाषा उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन का बिघडले आहे, याचा शोध आम्ही घेतोय. आदित्य ठाकरे, चतुर्वेदी यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या तोंडून आक्षेपार्ह भाषेचा वापर केला जात आहे. ज्यांना राज्यामधेच नाही तर देशामध्ये मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रेम आहे अशा राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याबद्दल ठाकरे अशा भाषेचा वापर करतात”, असे प्रसाद लाड म्हणाले.
पुढे लाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ”फडणवीसांबद्दल अशाप्रकारची खालची भाषा तुम्ही केलीत, तर तुम्ही कोणत्या थराला जात आहात, हे आम्हाला कळतंय. अशी भाषा आम्हालाही वापरता येते, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात, त्यामुळे आम्ही ती भाषा वापरणार नाही, पण वेळोवेळी अशा भाषेचा वापर झाला, तर निश्चितच बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत तुम्हाला उत्तर द्यावं लागेल”, अशा शब्दांत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.