ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उन पावसाचा खेळ : राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवारी विक्रमी तापमान नोंदवले गेले आहे. तर मंगळवारी उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

ऐन उन्हाळ्यात राज्यात अवकाळीचा तडाखा पाहायला मिळत आहे. आता आणखी चार दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यातच दुसरीकडे कोकण, ठाणे, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्याप कायम असल्याने वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. उत्तर ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

मंगळवारी मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेसच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे,सांगली, सोलापूरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर उद्या बुधवारी सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!