शिवा संघटनेचा महाविकास आघाडीला राज्यभर बिनशर्त पाठिंबा
राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांची माहिती
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
देशात वाढलेली हुकूमशाही त्यामुळे संविधानाला निर्माण झालेला धोका आणि शेतकरी,कष्टकरी जनतेचे व वीरशैव लिंगायत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवा संघटना व सेवा जनशक्ती पक्षाने राज्यभर महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे,अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी दिली. लोकसभेसाठी शिवा संघटनेची भूमिका काय असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,२१ मार्च रोजी आमची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत पुण्यामध्ये एक बैठक झाली.या बैठकीमध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय झालेला आहे.त्यांनी विधानसभेला जागा देण्याचा शब्द दिला आहे तर खास करून लोहा विधानसभा सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटनेला देण्याचा निर्णय झाला आहे.
आमची मागणी दहा जागांची आहे त्याबाबत या निवडणुकीनंतर चर्चा केली जाईल.परंतु लोकसभेबाबत मात्र आमचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तन-मन-धनाने महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत.महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही आठ लोकसभेसाठी प्रचार केला आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.आमच्या युतीचा मुद्दा सोलापूर लोकसभेपुरता नाही तर तो संपूर्ण देशासाठी आणि राज्यासाठी घेतलेला निर्णय आहे.
देशात लोकशाही वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या निर्णयाची गरज होती,असेही ते म्हणाले.सोलापूरसह राज्यात ठिक- ठिकाणी शिवा संघटना व कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे उमेदवार विजयी होतील,असा दावा त्यांनी यावेळी केला.शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य असून त्यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे आणि प्रचारात देखील सहभागी झालेलो आहोत,असे शिवा संघटनेचे कर्नाटक संपर्कप्रमुख प्रा.परमेश्वर अरबाळे यांनी स्पष्ट केले.
सोलापुरात आमदार प्रणितींना विजयी करू
सोलापुरात देखील महाविकास आघाडी बरोबर आमची युती झाल्याने आमचा पाठिंबा आमदार प्रणिती शिंदे यांना राहील.या ठिकाणी वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे.त्यांचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत ते सोडवण्यासाठी आमचा पाठिंबा प्रणिती यांना राहील.आमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे तर प्रचारात आहेतच.आवश्यकता वाटल्यास व बोलावणे आल्यास सभेच्या माध्यमातून देखील आम्ही महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर येऊन प्रचार करायला तयार आहोत.
प्रा.मनोहर धोंडे, अध्यक्ष शिवा संघटना