सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. दिवसभर उन्हाचा तडाका आणि सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाचा शिडकावा असा सिलसिला गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. शनिवारी सायंकाळी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळी काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे.
शनिवारी दिवभर कडक उन्हानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह सोलापूर शहर व ग्रामीण भागातील काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याचा परिणाम रविवारी दिवसभर दिसून आला. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली होती.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशावर पोहचला होता. रविवारी सोलापूरचे तापमान तब्बल ६ ते ७ अंशाने उतरत ३७.४ सेल्सिअस अशी नोंद झाली. गेल्या दोन दिवसात सोलापूर शहर-जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या पावसाची १९.६ मि.मी.ची नोंद झाली आहे. सोलापूर शहरातील विविध भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका आंबा आणि डाळिंब बागाला बसल्याची माहिती समोर आली आहे.