छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमावरी पहाटे तीन वाजल्यापासून विजांचा कडकडाटासह वादळी वारे व अवकाळी पाऊस झाला. विशेष म्हणजे शहर परिसरातील काही भागाला या अवकाळी पावसाने रात्री तीन ते साडेतीन तास झोडपून काढले. कोरड्या दुष्काळाची झळा सोसणाऱ्या भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, आन्वा, सिपोरा बाजार, बोरगाव जहाँगीर, विरेगाव, फत्तेपूर, नांजा, ईब्राहिमपूर, दानापुर, भायडी, केदारखेडा, राजूर, हसनाबाद, मासनपुर, कुंभारी, सोयगाव देवी आदी भागात काही भागाला रविवारी रात्री अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.
यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची तीव्रता अधिक असल्याने अनेक ठिकाणच्या घरावरील टिन पत्रे उडाली तर वाऱ्यामुळे मोठमोठाली झाडे उन्मळून पडली. शिवाय खरिपातील कापूस, मका तर रब्बीच्या गहू, हरभऱ्याचे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणच्या द्राक्ष, सीताफळ, पेरू आदी फळबागा या अवकाळीने बाधित झाल्या असून, आधीच दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांचे या अवकाळीने नुकसान झाले आहे. शहरतील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. याशिवाय पावसाचा जोर अधिक असलेल्या ठिकाणच्या शेतजमिनीत पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. तालुक्यातील बहुतांश भागात हा अवकाळी पाऊस झाला असून, या पावसाने अद्याप कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती असून, अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे तहसीलदार संतोष बनकर यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.