चेन्नई सुरत हायवेला समृद्धी मार्गाप्रमाणे भाव मिळण्यासाठी तातडीची बैठक ; खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
चेन्नई- सुरत हायवे बद्दल आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शनिवारी तातडीची बैठक
अक्कलकोट – देशात सर्वात नीचांकी दर देऊन शेतकरी समाज उध्वस्त करण्याचा घाट सरकारने घातला आहे. बागायतीसाठी सात लाख तर जिरायत जमिनीसाठी पाच लाखाचा दर निश्चित करून शेतकऱ्यांचा बळी घेण्याचे कारस्थान सुरू आहे. बाधित शेतकऱ्यांचा सरकार विरुद्ध तीव्र असंतोष खदखदत आहे. समृद्धी मार्ग किंवा पूर्वीप्रमाणे चारपट भाव मिळावा यासाठी लवकरच राज्यभर खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे करणार असल्याचे या बैठकीचे आयोजक शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले.
ही बैठक शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी येथील राजे फत्तेसिंह बोर्डिंग, तारामाता प्रशाला,मंगरूळे प्रशाले जवळ अक्कलकोट येथे दुपारी दीड वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत औरंगाबाद येथील ज्येष्ठ वकील अँड.मकरंद कटारे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीसाठी अक्कलकोट ग्रामीण व मैंदर्गी, नागनळी, मातनळी, कोन्हाळी, सिन्नर, हसापूर, चपळगाव, चपळगाव वाडी, बोरेगाव, कुरनुर, दहिटणे, दहीठणेवाडी डोंबर जवळगे, सिंदखेड आणि अक्कलकोट तालुक्यातील सुरत चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवे बाधित नोटीस आलेले / अजून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी केले आहे.