मुंबई : वृत्तसंस्था
युतीधर्म पाळताना महायुतीने दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात शड्डू ठोकणारे शिवसेना नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांना दिली. मात्र महायुती धर्माचे पालन करण्याबरोबरच अजित पवारांना माझा आवाका दाखवूनच देतो.
येत्या एक-दोन दिवसांत नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईन, अशी सूचक प्रतिक्रिया देत शिवतारे यांनी आपली विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि आघाडी या दोघांचेही संपूर्ण जागावाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शिवतारे यांना आव्हान देऊन पाडले. हाच राग मनात ठेवून शिवतारे यांनी या मतदारसंघावर दावा करत पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे शिवतारे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारीही पुन्हा शिवतारेंशी चर्चा करत युती धर्म पाळण्याचा सल्ला दिला.
‘वर्षा’ निवासस्थानी शिवतारे आणि शिंदे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. युती धर्म पाळताना महायुतीने दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी सूचना शिंदे यांनी केली. शिवतारे यांनी मात्र आपण माघार घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे स्पष्ट केले.