अक्कलकोट, दि. २१ – अक्कलकोट नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी परिवारच्यावतीने तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथे मंगळवारी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त हजारो साधू संताना अन्नदान, वस्त्रदान करुन उबदार चादर वाटप करण्यात आले.
खेडगी परिवाराची धर्मकार्य आणि प्रसाद वाटपाची परंपरा सुमारे ७० वर्षांपासून कायम आहे. दानशूर, शिक्षणमहर्षी कै. चनबसप्पा खेडगी यांनी सुरु केलेली ही परंपरा त्यांचेच पुत्र कै.शिवशरण खेडगी यांनी ही हीच परंपरा अखंडपणे सुरू ठेवली होती. त्यांचाच वसा घेऊन माजी नगराध्यक्षा श्रीमती शोभाताई खेडगी यांनी मोठ्या नेटाने पुढे घेऊन जात आहेत. व त्यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष तथा अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी आणि नातवंडांना देखील या परंपरेला कृतीतून पुढे नेण्याचा धडा देत आहेत. संपूर्ण खेडगी परिवार या पुण्यकर्मात स्वतःला झोकून देऊन कार्यमग्न असल्याचे पाहायला मिळते.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाच्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अन्नदान करण्याच्या या धर्मकार्यातून माणसं जोडण्याच्या आणि संस्कृती-परंपरेला पुढे नेण्याच्या या निरपेक्ष भावनेने होत असलेल्या पुण्यकर्माबाबत साधु- संतातून समाधान व्यक्त होत आहे.अन्नदान वाटप यशस्वी करण्यासाठी बसलिंगप्पा खेडगी, पवित्रा खेडगी, सिध्दम्मा कलशेट्टी, आकाश कलशेट्टी, चन्नवीर खेडगी, सचिन रोडगे, गौरीशंकर बुधवंत,अभिषेक आळगी, देविदास गुरव, बिरप्पा हिरकुर, रावसाहेब तेगेहळ्ळी, मल्लू होटगोंड, दशरथ वालीकर, सिधु पडनुर, भिमाशंकर जमादार, गुरुनाथ कलशेट्टी, परमेश्वर कलशेट्टी, शिवानंद बाळीकाई, मुत्तण्णा वाले, हुली पुजारी, विनायक हिरेमठ व अनेक महिलांनी परिश्रम घेतले.
उद्या होणार महाभिषेक
गुढीपाडवा च्या मुहूर्तावर बुधवारी ( दि.२२) पहाटे ठिक एक वाजता सोलापूरमधील भाविकांच्या वतीने श्री मल्लिकार्जुन शिवलिंगास महाअभिषेक होणार आहे. त्यानंतर शोभाताई खेडगी परिवाराच्या वतीने “श्री” स प्रसाद चा नैवेद्य दाखवून लाखो भाविकांना लाडू वाटपास प्रारंभ होणार आहे. हा लाडू वाटप बुधवारी सायंकाळी सहा वाजता रथोत्सव सोहळा पर्यंत सुमारे पंधरा ते सोळा तास चालणार आहे.
निरंतर परंपरा सुरू
दानशूर स्वर्गीय चनबसप्पा खेडगी यांनी सन १९७२ च्या दुष्काळ परिस्थिती मध्ये तालुक्यातील जनतेनां मोफत झुणका भाकर वाटप केले, सन १९९२ मध्ये भीषण पाणीटंचाई परिस्थिती मध्ये स्वतःचे आईल मिल बंद ठेवून सुमारे सात टँकर व्दारे अक्कलकोट शहर वासियांना मोफत पाणी वाटप केले. विशेषतः खेड्या-पाड्यात जाऊन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, सायकल, दप्तर, पेन, वह्या वाटप करण्यात ते धन्यता मानत होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कोरोना महामारीच्या काळात स्वर्गीय शिवशरण खेडगी यांनीही गोरगरीब गरजूंना त्यांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान पुरवले. गरजूंना मदत करणे हे काम खेडगी परिवार सामाजिक बांधिलकीतून आवडीने करताना दिसतात. सदरची परंपरा निरंतर पणे सुरू आहे.