ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नितेश राणेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा – वर्षा गायकवाड

मुंबई वृत्तसंस्था 

“भाजपच्या नितेश राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी करुन तिथल्या लोकांना दहशतवाद्यांशी जोडण्याचे विखारी विधान हा संविधानातील सिद्धांतांवर थेट हल्ला आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्या पदाच्या तत्वांशी केलेला हा विश्वासघात आहे. भारतीय जनता पक्ष नितेश राणेंच्या विखारी आणि विभाजनकारी वक्तव्यांचे समर्थन करते का? अशाप्रकारे असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा”, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली.

“नितेश राणे हे सातत्याने हिंदू मुस्लीम, पाकिस्तान अशी भाषा वापरून एका समाजाला टार्गेट करत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. नितेश राणेंचा ‘बॉस’ ‘सागर’ बंगल्यावरून ‘वर्षा’वर गेल्यामुळे त्यांची हिम्मत जास्तच वाढलेली दिसते. पण मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी नितेश राणे यांच्या विधानावर खुलासा करावा. त्यांच्यावर कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी विभाजनकारी भाषा खपवून घेतली जाणार नाही”, अशा शब्दांत वर्षा गायकवाड यांनी सुनावलं आहे.

 

“भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतेही समाजात विष पसरवणारी विधाने करत असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही एका निवडणूक प्रचारात वायनाडची तुलना पाकिस्तानशी केली होती. अशा द्वेषपूर्ण विधानांच्या माध्यमातून भारताच्या सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणून असलेल्या अस्तित्वाचा विरोध केला जात आहे. विभाजनकारी राजकीय अजेंड्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने संवैधानिक तत्त्वांची पायमल्ली करत आहे. भाजप-आरएसएसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कधी स्विकारलेच नाही. पण हा देश संविधानानेच चालणार, भाजपाच्या संघाच्या विधानाने नाही”, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी बजावले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!