मुंबई : वृत्तसंस्था
दि.४ एप्रिल रोजी संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असतानाच मराठी मनोरंजन विश्वावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे आज निधन झाले. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. डॉ. उजवणे यांच्या जाण्याने मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
विलास उजवणे यांचा जन्म 16 डिसेंबर 1964 मध्ये नागपूरमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण नागपूर मध्येच झाले. गव्हमेंट आर्युवेद महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटक, एकांकिकांमधून भूमिका केल्या. नंतर मुंबईत येऊन त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. ‘शुभम भवतू’ हा त्यांचा डायलॅाग विशेष लोकप्रिय झाला होता. विलास उजवणे यांची ‘वादळवाट’ या मालिकेतील भूमिका विशेष गाजली. याशिवाय ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘दामिनी’ यातही ताकदीने केलेल्या खलनायकाच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील. विलास उजवण यांनी एकूण 110 चित्रपट, 140 मालिका आणि तब्बल 67 नाटकांचे 3000 हून अधिक प्रयोग केले आहेत. त्यांनी हिंदी सिनेमांमध्येही काही भूमिका साकारल्या होत्या.
अभिनेते विलास उजवणे यांना 2022 साली ब्रेन स्ट्रोकने ग्रासले होते. ज्यामुळे त्यांना गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारासाठी लागणारा खर्च वाढत गेल्याने त्यांची आर्थिक स्थिती देखील गंभीर झाली होती. त्यावेळी त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट करत इंडस्ट्रीतील कलाकार, संस्थांना आणि चाहत्यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते. यापाठोपाठ, त्यांना उपचारांमध्ये सुधारणा झाली आणि ते आजारातून पूर्णपणे बरे झाले. आजारपणातून बरे झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केला. ‘कुलस्वामिनी’ या मराठी सिनेमात त्यांनी भूमिका साकारली, तसेच ’26 नोव्हेंबर’ या मराठी चित्रपटातही त्यांनी एक महत्वाची भूमिका निभावली होती, जो पुढील महिन्यात प्रदर्शित होणार होता. अशा परिस्थितीत, त्यांचे निधन सर्वांनाच धक्का देणारे आहे. त्यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर मोठा शोक व्यक्त केला जात आहे. त्यांची अभिनयकला आणि योगदान मराठी मनोरंजन क्षेत्रात सदैव लक्षात राहील.