मुंबई : वृत्तसंस्था
मराठी चित्रपटश्रुष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे दुःखद निधन झाले आहे. स्टेजवर परफॉर्म करतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सतीश जोशी यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटश्रुष्टीवर शोककळा पसरली आहे.
रंगोत्सवात व्यासपीठावर असताना सतीश जोशी अचानक जमीनीवर पडले आणि त्यांचे निधन झालं. राजेश देशपांडे यांनी फेसबूकवर सतीश जोशी यांचा एक फोटो पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ”आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले. सतीश जोशी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय केला. स्टेजवर परफॉर्म करत असताना ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमात सतीश जोशी देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान त्यांचे निधन झाले”, असे राजेश देशपांडे यांनी म्हंटले आहे.
रविवारी सकाळी 11 वाजता मध्यांदिन ब्राह्मण सभा येथे गिरगाव रंगभूमीवर सतीश जोश यांनी एक छोटा प्रवेश सादर केला. त्यानंतर सतीश जोशी यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ हरकिसन दास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सतीश जोशी अनेक मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. त्यांची झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आणि त्यांची ही भूमिका गाजली देखील. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक नाटकांमधून आणि सिनेमांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.