दिल्ली वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटनेत काही बदल केले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटपाच्या आरोपाने विनोद तावडे हे चर्चेत आले होते. त्यावेळी विनोद तावडे यांनी आरोप करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत आरोप करणाऱ्यांना अब्रुनुकसानीच्या नोटीसा पाठवल्या होत्या.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यानंतर अध्यक्ष कोण होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजप संघटना यांच्या समन्वयासाठी केंद्रीय निरीक्षकांची घोषणा करण्यात आली. यात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विनोद तावडे यांच्यावर दोन मोठ्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आलीय. केंद्रीय निरीक्षक म्हणून विनोद तावडे हे उत्तर प्रदेश आणि बिहारचे काम पाहतील. त्यांच्याकडे ही दोन राज्ये सोपवल्यानं अध्यक्षपदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव आहे.
विनोद तावडे यांच्यासोबत संजीव चौरसिया, संजय भाटिया आणि लालसिंग यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.भाजप मंडल अध्यक्षांची निवड १५ डिसेंबर तर जिल्हाध्यक्षांची निवड ३० डिसेंबरपर्यंत होईल. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यासाठी दिल्लीत कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित आहे. फेब्रुवारी २०२५ अखेर भाजपच्या अध्यक्षांची निवड होऊ शकते.