नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रातील भाजप सरकार देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरवत असून गरीब आणि तरुणांच्या हिताकडे दुर्लक्ष करून बड्या कंपन्यांसाठी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला आहे. द्वेषाविरुद्ध लढणे व एकजुटीसाठी बंगालने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मणिपूरमधून काढण्यात आलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उत्तर बंगालमधील सिलिगुडी जिल्ह्यात दाखल झाली. या वेळी नागरिकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने सशख दलांसाठी अग्निवीर योजना, अल्पकालीन भरती योजना सुरू करून सशत्र दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुणांची थट्टा केली आहे आता देशभर द्वेष आणि हिंसाचार पसरवला जात आहे. यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही. द्वेष पसरवण्याऐवजी आपण आपल्या तरुणांसाठी प्रेम आणि न्याय देण्याचे काम केले पाहिजे. पण, हे न करता केंद्र सरकार गरीब आणि तरुणांच्या मागण्यांकडे कानाडोळा करून फक्त बड्या कंपन्यांसाठी काम करत आहे, अशी तोफ राहुल गांधी यांनी डागली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भारत जोडो न्याय यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल राहुल गांधी यांनी जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बंगाल एक विशेष स्थान आहे. बंगालने स्वातंत्र्य लढ्यात वैचारिक लढा दिला. सद्यःस्थितीत द्वेषाच्या विरोधात लढण्याचा मार्ग दाखवणे आणि देशाला एकजूट करणे, हे बंगाल राज्य आणि प्रत्येक बंगाली नागरिकाचे कर्तव्य आहे. जर तुम्ही प्रसंगावधान राखले नाही तर लोक तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत, असे राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले.