तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२८ : यंदाचा प्रजासत्ताक
दिन गोगाव गावासाठी सुवर्ण दिवस ठरला. गोगाव ग्रामपंचायतमध्ये मागील २७ वर्ष पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शिवपुत्र कलशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सरपंच वनिता सुरवसे
यांनी ग्रामपंचायतीचे महाराष्ट्रात एक वेगळे स्थान निर्माण केले.सरपंच सुरवसे यांनी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा एक वेगळा सन्मान केला, स्वतःचा मान पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला देऊन त्यांचा जो सन्मान केला ते गोगावकर कदापि विसरणार नाहीत.२७ वर्षे रात्रंदिवस अविरत सेवा देणारे कलशेट्टी यांचे किती कौतुक करावे तेवढे कमी आहे.रोज सकाळी पहाटे तीन वाजता उठून ४ किलोमीटर लांब भुरीकवट्याला जावे लागते, मोटर चालू करावी लागते, लाईट गेली परत मोटर बंद पडते,परत मोटर चालू करावी लागते,ग्रामपंचायतमध्ये आम्हाला मदत करण्यामध्ये कलशेट्टी यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे त्यांना हा ध्वजारोहणाचा मान मी अर्पण करून त्यांचा हा छोटासा सन्मान ग्रामपंचायतीतर्फे केला,
असे सरपंच सुरवसे यांनी सांगितले. कलशेट्टी यांना ध्वजारोहण करण्यासाठी खास पत्र पाठवून निमंत्रण दिले. पत्र पोहोचताच त्यांना अश्रू अनावर झाले, त्यांनी सरपंचांना भेटून ,आपण जो मला सन्मान दिलात तुम्ही मरेपर्यंत विसरणार नाही आणि यापुढे मी दुप्पट गतीने माझे ग्रामपंचायतचे काम करेल, आपण जो मला ध्वजारोहणाचा मान देऊन तो सन्मान केलात त्याबद्दल संपूर्ण ग्रामपंचायतीचे व आपले ऋणी राहील, अशी भावना कलशेट्टी यांनी व्यक्त केली.यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, सदस्य प्रदीप जगताप, लक्ष्मण बिराजदार, ललिता कलशेट्टी,महादेवी मुलगे, तंटामुक्त अध्यक्ष सूर्यकांत जिरगे, पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड, डॉक्टर नडगिरी, वळसंगकर सिस्टर, ग्रामसेवक विक्रम घाटे, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका अंगणवाडी सेविका, सर्व शिक्षक, व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. सोनकांबळे यांनी आभार मानले.