ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मतदानाच्या तोंडावर घात! पॅनल १८ मध्ये बनावट पॅम्प्लेट व्हायरल

मुंबई वृत्तसंस्था : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोनच दिवस उरले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असतानाच पॅनल क्रमांक १८ मध्ये एक विचित्र आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. महायुतीच्या अधिकृत प्रचार पॅम्प्लेटमध्ये फेरफार करत भाजप उमेदवाराच्या कमळ चिन्हाच्या जागी एका अपक्ष उमेदवाराचे कपाट चिन्ह छापलेले बनावट पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

पॅनल क्रमांक १८ मध्ये भाजपच्या रेखा चौधरी या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित तीन जागांसाठी महायुतीतर्फे भाजपच्या स्नेहल मोरे, शिवसेनेचे मल्लेश शेट्टी आणि नवीन गवळी अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मात्र, गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पॅम्प्लेटमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहल मोरे यांच्या कमळ चिन्हाऐवजी शिवसेनेच्या बंडखोर अपक्ष उमेदवार मनोज चौधरी यांच्या पत्नी प्रीती चौधरी यांचे कपाट चिन्ह छापण्यात आले आहे. “आमचं ठरलंय” असा मजकूर टाकून मतदारांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या बनावट पॅम्प्लेटमुळे नेतीवली परिसरातील मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही तणाव वाढला आहे. महायुतीमध्ये फूट पडल्याचा खोटा संदेश पसरवण्याचा हा डाव असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महायुतीचे उमेदवार मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, स्नेहल मोरे तसेच भाजपचे निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. आमची महायुती भक्कम असून विरोधकांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी अशा प्रकारे मतदारांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मल्लेश शेट्टी यांनी केला. स्नेहल मोरे या भाजपच्या अधिकृत उमेदवार असून बनावट पॅम्प्लेट तयार करणाऱ्यांवर सायबर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आल्याचे नरेंद्र सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे बनावट पोस्टर कोणत्या सोशल मीडिया ग्रुपमधून व्हायरल झाले, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पॅनल १८ मधील चुरस अधिकच वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!