ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग.. फरार वाल्मीक कराडची अखेर शरणागती

पुणे वृत्तसंस्था 

 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत. यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती सीआयडीतील सूत्रांनी दिली. वाल्मीक कराड आजच शरण येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच सीआयडीच्या कार्यालयासमोर गर्दी झाली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. वाल्मिक कराडवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली होती.

त्यानंतर आज सकाळपासूनच पुण्यातील सीआयडीच्या मुख्य कार्यालयाबाहेर हालचालींना वेग आला होता. परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. वाल्मिक कराडांविरोधात खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा कराड समर्थकांनी केला होता. त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यात गाजत आहे. ज्या निघृण पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चातील या नागरिकांच्या प्रतिक्रियाही अत्यंत संतप्त होत्या. वाल्मीक कराडला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी या मोर्चात करण्यात आली होती. यानंतर दबाव वाढत चालला होता.

सीआयडीच्या पथकांनी कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू केल्याने त्यांच्यावरील मानसिक दबावही वाढला आहे. याशिवाय, बँक खाती गोठवून केलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे वाल्मीक कराड याच्यासमोर आता कोणताही पर्याय उरला नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच आता वाल्मीक कराड सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येईल, असे सांगितले जात होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!