नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लोकसभेच्या संसदेत वक्फ विधेयक मंजूर करण्यात आले असून यावर आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सभागृहावर जबरदस्तीने वक्फ विधेयक मंजूर केल्याचा आरोप केला. सोनिया गांधी यांनी सरकारविरुद्ध केलेल्या या वक्तव्याचा सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी जोरदार निषेध केला. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि निष्पक्ष चर्चा झाली असल्याचे प्रतिपादन केले. यानंतर शुक्रवारी (दि.४) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही वेळातच लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर पाठोपाठ दुपारी १. ३० वाजता राज्यसभा देखील अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.
सकाळी ११ वाजता कनिष्ठ सभागृहाचे अधिवेशन सुरू झाली. सोनिया गांधी यांच्या सरकारवर टीका करणारे वक्तव्य केले. दरम्यान काही काळासाठी सभागृह तहकूब करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. दरम्यान, सत्ताधारी सदस्यांनी “सोनिया गांधी माफी मागो” अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यानंतर विरोधी पक्षनेतेदेखील आक्रमक झाल्याने लोकसभेत गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर काही वेळातच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली.
पश्चिम बंगालमध्ये २५,७०० हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती अवैध ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याबद्दल घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाल्याने शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर दुपारी १.३० वाजता राज्यसभा देखील अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.
सकाळच्या सत्रासाठी वरिष्ठ सभागृहाची बैठक झाली तेव्हा, राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा, निरोप संदेश आणि सूचीबद्ध पत्रके मांडली. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी पश्चिम बंगालच्या अवैध भरतीच्या विषयावर घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन यांनी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला तेव्हा गोंधळ सुरू झाला आणि धनखड यांना दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी १ वाजेपर्यंत सभागृह तहकूब करावे लागले.