मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१ : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची जोरदार चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरात देखील खबरदारी घेण्यात येत असून लसीकरण मोहीम प्रभावी राबविली जात असल्याचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले. ते काल अक्कलकोटमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ज्यांनी आतापर्यंत कोरोना लसच घेतली नाही त्या सर्व नागरिकांनी लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अक्कलकोट तालुक्यात पहिला डोस घेणाऱ्यांची सख्या ९६ टक्के इतकी आहे.परंतू दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र खूपच कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी दुसरा डोस घेऊन कोरोनावर मात करावी.कारण सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट रुग्ण कर्नाटकात आढळून आला आहे. अक्कलकोट हे कर्नाटक सीमेवर असल्याने कर्नाटकात ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.म्हणून नागरिकांनी गाफील न राहता मास्क, सॅनिटाएझर आदींचा वापर करुन कोरोनामुक्त शहर कसा राहिल यासाठी प्रयत्न करावा.कारण गेल्या दीड वर्षानंतर नुकताच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन बाजारपेठ खुली झाली आहे. ही परिस्थिती जर कायम ठेवायची असेल तर नागरिकांनी कोरोनाच्या बाबतीत निष्काळजी न करता सतर्क राहण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.
जनतेनी सहकार्य करावे
सध्या महाराष्ट्रात सरकार ही यासाठी आटोकाट प्रयत्न करुन या महामारीच्या विरोधात लढ देत आहेत.यासाठी सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. जेणेकरून या मोहिमेला बळ मिळेल – सचिन पाटील, मुख्याधिकारी