ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बेसमेंटमध्ये पाणी घुसले अन तीन विद्यार्थी बुडाले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्यामुळे ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. राजेंद्रनगर परिसरात पूर आल्याच्या काही तासांनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या बचाव पथकांने तिघांचे मृतदेह शोधून बाहेर काढले. या ३ मृतांमध्ये दोन मुली आणि एका तरुणाचा समावेश आहे. तिघेही यूपीएससी परीक्षेची तयारी करत होते. उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि केरळमधील हे विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले तिन्ही विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजे यूपीएससीचे शिक्षण घेत होते. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या सोनी आणि केरळच्या एर्नाकुलम येथील निविन डॅल्विन अशी तीन मृतांची नावे आहेत. या तिघांचे मृतदेह आरएमएल शवागारात पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली अग्निशमन विभागाला शनिवारी संध्याकाळी ७ वाजता राव आयएएस स्टडी सेंटर आणि करोल बाग परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याबद्दल कॉल आला. या राव कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले असून त्यामध्ये २ ते ३ विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळाली होती. या तिन्ही विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. पावसाचे पाणी कोचिंग क्लासेसच्या बेसमेंटमध्ये वाहत राहिल्याने पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्नही अयशस्वी झाले. मात्र रस्त्यावरील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर त्यांनी पाण्याची पातळी १२ फुटांवरून ८ फुटांवर आणली आणि विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले. कोचिंग सेंटरमध्ये जवळपास ३० विद्यार्थी होते. त्यापैकी १२ ते १४ विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तर इतर विद्यार्थी पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी सांगितले की, बचाव कार्य पूर्ण झाले असून तळघरात पाणी कसे शिरले आणि तेथे वाचनालय का होते याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करत कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी एमसीडी आयुक्तांना निर्देश दिले आहेत की, एमसीडीच्या अखत्यारीत येणाऱ्या संपूर्ण दिल्लीतील अशा कोचिंग सेंटर्सवर कठोर कारवाई केली जावी. या दुर्घटनेला एमसीडीचा कोणी अधिकारी जबाबदार आहे का?, याचा शोध घेण्यासाठी तातडीने तपास केला जाईल, असे देखील त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!