अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून मैंदर्गी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आणि एम.एस युथ फाउंडेशन यांच्यामार्फत अध्यक्ष महेश शावरी यांनी स्वखर्चातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.ऐन संकटाच्या काळात त्यांनी सुरू केलेल्या टँकरमुळे टंचाईग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून स्वखर्चातून ते मैंदर्गी शहराला पाणीपुरवठा करत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी हे एक मोठे शहर.१८ हजार लोकवस्तीच्या शहरात सध्या पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.पाच ते सहा दिवसात पाणीपुरवठा सुरू आहे.बोरी नदीतून विहिरीद्वारे शहराला पाणीपुरवठा होतो मात्र यावर्षी अत्यल्प पडलेल्या पावसामुळे या शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. याचा विचार करून महेश शावरी यांनी पहिल्या टप्प्यामध्ये शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे त्या त्या ठिकाणी १ हजार ते २ हजार लिटरच्या पाण्याच्या तब्बल २८ टाक्या शहरामध्ये बसविल्या पण पुढे पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने या ठिकाणी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यानंतर आता पुन्हा शावरी स्वतंत्र टँकर लावून त्या ठिकाणी स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.केवळ सामाजिक बांधिलकीतून त्यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.
पावसाळा संपेपर्यंत टँकर सुरू राहणार
कमी पावसामुळे मैंदर्गीवर पाण्याचे संकट ओढावले आहे.पाण्याची पातळी खाली गेल्याने अनेक बोअर बंद आहेत. या उपक्रमातून मैंदर्गीकरांचे सामाजिक ऋण आपण फेडावे हा या पाठीमागचा उद्देश आहे. पावसाळा सुरू होऊन पाणी प्रश्न मिटेपर्यंत टँकर सुरू राहणार आहे.
– महेश शावरी,अध्यक्ष