ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आम्ही भ्रष्टाचार मुक्त झालो ; खा.सुळे यांचा घणाघात

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपले बंधू तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला हाणला आहे. आमच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे. पण आता आमच्यावर केवळ घराणेशाहीचे आरोप होतात. याचा अर्थ आता आम्ही भ्रष्टाचार मुक्त झालो आहोत, असे त्या म्हणाल्यात. भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर संसदेत विधवा महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप मी माझ्या कानाने ऐकला व डोळ्यांनी पाहिला, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजप व अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या 70 हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचारावर टीका केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार भाजपसोबत गेले. भाजप या मुद्यावरून सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत होता. पण आता त्यावर अवाक्षरही काढत नाही. आता आमच्यावर केवळ घराणेशाहीचे आरोप होतात. याचा अर्थ आम्ही आता भ्रष्टाचारमुक्त झालो आहोत, असे सुप्रिया सुळे भाजप व अजित पवारांवर निशाणा साधताना म्हणाल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्यावर घराणेशाहीची टीका केली. हा आरोप आम्हाला मान्य आहे. पण उद्धव ठाकरे भाजप सोबत होते तेव्हा त्यांना त्यांची घराणेशाही चालत होती. मग आताच काय झाले? आता त्यांना त्यांची घराणेशाही का चालत नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यासंबंधी उपस्थित केला. सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर विधवा महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. हा आरोप संसदेत ऑन रेकॉर्ड करण्यात आला होता. हा आरोप मी माझ्या कानांनी ऐकला व डोळ्यांनी पाहिला. यामुळे भ्रष्टाचारी कोण? हे सर्वांना माहिती आहे. माझी लढाई महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या दिल्लीच्या तख्ताविरोधात आहे. देशाचे पंतप्रधान शरद पवार यांच्यावर टीका करत असतील तर त्यात वाईट काय? ही लोकशाही आहे. याच भाजपने शरद पवार यांचा पद्मविभूषण देऊन सन्मान केला होता. यासाठी मी भाजप सरकारचे आभार मानते, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!