शिवसेना आणि वंचितच्या युतीबद्दल काय म्हणाले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.. वाचा सविस्तर
मुंबई दि. २४ जानेवारी – शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा आणि सतर्कता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही परंतु मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
कसबा व चिंचवडबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील व त्यावर निर्णय होईल. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल असे सांगतानाच वातावरण निर्माण करण्यासाठी मागण्या, घोषणा, ठराव करण्याचे कार्यक्रम सध्या भाजपकडून सुरू आहेत. सध्या विरोधकांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न चिंचवडमध्ये भाजप करत आहे. मात्र खरी चौकशी तर पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची करायला हवी. त्याठिकाणी चौकशी केली तर भाजपचा किती भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले.
आज राष्ट्रवादी काँग्रेसची आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यात सध्या जे प्रश्न सुरु आहेत त्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.