ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही ; रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांचे ठाम प्रत्युत्तर

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या विधानामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव देशमुखांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख यांचे पुत्र व अभिनेता रितेश देशमुख यांनी संयम राखत, मात्र तितक्याच ठाम आणि खणखणीत शब्दांत रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले आहे.

लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात आले असताना रवींद्र चव्हाण यांनी सभेत भाषण करताना, “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसतोय, त्यावरून विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील,” असे विधान केले होते. या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. लातूरकरांच्या मते विलासराव देशमुख हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर जनतेच्या मनात खोलवर रुजलेले नेतृत्व होते. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या विकासात्मक निर्णयांची आठवण आजही कृतज्ञतेने काढली जाते.

या साऱ्या घडामोडींनंतर रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. “दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र,” अशा शब्दांत त्यांनी वडिलांच्या कार्याची आणि जनतेच्या मनातील त्यांच्या स्थानाची जाणीव करून दिली. मोजक्या शब्दांत दिलेल्या या प्रतिक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, आमदार अमित देशमुख यांनीही चव्हाण यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. “लातूरमधील प्रत्येक माणसाच्या आयुष्याला विलासराव देशमुख साहेबांचा स्पर्श झाला आहे. प्रत्येकाच्या मनावर त्यांची आठवण कोरलेली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी येऊन सांगितल्याने ही आठवण कधीच पुसली जाणार नाही,” असे सांगत त्यांनी भाजपच्या नेत्यांना लातूरच्या अस्मितेची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

या वादग्रस्त वक्तव्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, विलासराव देशमुख यांच्या स्मृती आणि कार्याभोवती पुन्हा एकदा मराठवाड्याचे राजकारण केंद्रस्थानी आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!