चिखली : वृत्तसंस्था
सोयाबीन, कापसाचे भाव पडले असून, हमीभावाने होणारी खरेदीदेखील बंद आहे. तुम्ही ठरवाल, तो हमीभाव घेण्यासदेखील शेतकरी तयार असताना व्यापारी मात्र हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत आहेत. उलट मिळणारा भाव आम्हाला मान्य आहे, असे शपथपत्र शेतकऱ्यांकडून व्यापारी लिहून घेत आहेत. यावर पोलीस कुठलीच कारवाई करत नाहीत आणि करूही शकत नाहीत. खासदार, आमदारांना खोक्याचा हमीभाव मिळाला; मात्र शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव केव्हा मिळणार? असा प्रश्न शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी संवाद मेळाव्यात खास ठाकरी शैलीत सरकारला विचारला. त्यांनी भाजपवरही कठोर प्रहार केले.
शहरातील राजा टॉवर येथे २२ फेब्रुवारीला संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, खा. संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, युवा सेनेचे वरुण सरदेसाई, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख भास्कर मोरे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, छगन मेहेत्रे, कपिल खेडेकर, नंदू कऱ्हाडे, श्रीकिसन धोंडगे, श्रीराम झोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही, परंतु आज उघड उघड महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचा उद्योग सुरू आहे. देशातील सर्व राज्ये समृद्ध झालीच पाहिजेत. तसे झाले तरच देश महाशक्ती बनेल, पण याचा अर्थ महाराष्ट्राचे वैभव ओरबाडून गुजरातला न्यावे असा होत नाही. हा प्रकार महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असे कणखरपणे बजावले.