विमानतळाचा हट्ट सिद्धेश्वर कारखान्याजवळच कशाला ? चपळगाव सरपंच उमेश पाटील यांचा सवाल; ग्रामपंचायत व भूमिपुत्र संघटनेचा चिमणी पाडकामा विरोधात ठराव
अक्कलकोट, दि.२७ : इतर सर्व शहरात विमानतळही शहराच्या बाहेर आहेत. विमानसेवेला आमचा अजिबात विरोध नाही पण चिमणी पाडकामाला आमचा विरोध आहे. विमानतळाचा हट्ट सिद्धेश्वर कारखाना परिसरातच का, बोरामणीला विमानतळ यांना का चालत नाही ? हे षडयंत्र आहे. ते आम्ही हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी दिला आहे. रविवारी,चपळगाव ग्रामपंचायत, भूमिपुत्र संघटना व ग्रामस्थांच्यावतीने तातडीने चिमणी पाडकामाला विरोध करणारा ठराव करण्यात आला आणि त्याच्याप्रती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडू नये. हजारो मजूर व कामगारांची चूल या कारखान्यामुळे पेटते. हजारो शेतकऱ्यांचे हित यावर अवलंबून आहे. याचा आधी विचार शासनाने करावा,असे त्यांनी म्हटले आहे. सोलापूरचा विकास व्हावा, उद्योग वाढीला लागावेत, याबाबत आमचे दुमत नाही पण केवळ सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी मुळे विकास थांबला आहे हे म्हणणे गैर आहे. केवळ मुठभर लोकांच्या सोयीसाठी हा प्रयत्न चालू आहे. तो आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धेश्वर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. दराच्या बाबतीत तर कारखाना एक नंबर आहे जर यात कोणी राजकारण करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही प्रसंग पडल्यास रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे, असे स्वामी समर्थ कारखान्याचे माजी संचालक बसवराज बाणेगाव यांनी सांगितले. सिद्धेश्वर कारखाना हा सहकारी तत्त्वावर अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. तो मोडकळीस आणण्याचा डाव काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुरू आहे. यामागे कुठे तरी राजकीय षडयंत्रच आहे. कारखान्याचा कारभार आम्ही जवळून पाहिला आहे.काडादी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शी कारभार सुरू आहे असे असताना या मूठभर लोकांच्या सोयीसाठी कारखाना बंद करणे हे योग्य नाही, असे मत ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे यांनी व्यक्त केले.
यावेळी चपळगाव ग्रामपंचायत, भूमिपुत्र शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्यावतीने या निर्णया विरुद्ध एकमताने ठराव करण्यात आला. यावेळी दक्षिणमुखी हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणुन मनोज इंगोले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत व
ग्रामस्थाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाले, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे धानप्पा डोळळे, खंडप्पा वाले, सोमनाथ बानेगाव, ब्रम्हांनंद म्हमाणे, शरणप्पा ख्याडे, ज्ञानेश्वर कदम, सुरेश सुरवसे, राजकुमार कोळी, कामगार नेते नंदकुमार भंगे, कुमार दुलंगे, श्रीशैल नागणसुरे, मडोळप्पा बानेगाव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरणार
येत्या दोन दिवसात याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास आम्ही रस्त्यावर तर उतरणार आहोतच पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या ठरावाची प्रत देऊन सर्व शेतकरी मिळून आंदोलन करण्याची तयारीत आहोत. जो पर्यंत हा निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.