ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारताला तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनवणार – शाह

नांदेड : वृत्तसंस्था

काँग्रेसच्या कार्यकाळात भारत जागतिक अर्थव्यवस्थेत १२ व्या क्रमांकावर होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाचव्या क्रमांकावर आणून ठेवले आहे. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधानाची संधी दिल्यास मोदी भारताला तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनवतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे व्यक्त केला.

नांदेड लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी येथील मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन, उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. अजित गोपछडे आदींची उपस्थिती होती.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असतानाही काँग्रेसने आपल्या कार्यकाळात केवळ मतांच्या राजकारणासाठी ३७० कलम चालू ठेवले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते हटवून सर्व भारतीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली. काँग्रेसच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये दररोज दगडफेक, बॉम्बस्फोट घडत होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात पाकिस्तानकडून पुलवामा व उरी येथे आगळीक घडताच पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानात घुसून सर्जिकल व एअर स्ट्राइक करून त्याला सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत कोणताही देश करत नाही. याशिवाय महाराष्ट्रातील काही भागात सुरू असलेल्या नक्षलवादी कारवायांवरही मोदींनी नियंत्रण मिळवले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!