ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘लाडकी बहीण’ला २१०० रुपयांची भेट मिळणार? ‘या’ दिवशी होणार घोषणा ?

६ मार्चच्या अर्थसंकल्पाकडे राज्यातील महिलांचे लक्ष; हप्ता वाढीची प्रतीक्षा कायम

मुंबई : वृत्तसंस्था

राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा करताना हप्ता २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, योजना सुरू होऊन जवळपास दोन वर्षे होत आली तरीही वाढीव रकमेची अंमलबजावणी झालेली नाही.

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरी हप्तावाढीबाबत घोषणा होईल, अशी अपेक्षा लाभार्थींमध्ये होती. परंतु त्यावेळी कोणतीही ठोस घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तरी ‘लाडक्या बहिणीं’ना दिलासा मिळणार का, याकडे राज्यभरातील महिलांचे लक्ष लागले आहे. राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पात विविध लोककल्याणकारी योजनांसाठी निधीची तरतूद अपेक्षित आहे. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी वाढीव निधी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र १५०० रुपयांवरून २१०० रुपयांपर्यंत हप्ता वाढवण्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून ६ मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्याच्या तिजोरीवर विविध योजनांचा वाढता ताण लक्षात घेता हप्तावाढ तातडीने जाहीर होईल का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. दुसरीकडे, महिलांमध्ये या योजनेबाबत मोठी अपेक्षा निर्माण झाल्याने सरकारसमोर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा निर्णय घेण्याचे आव्हान आहे. आता ६ मार्चच्या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेला वाढीव २१०० रुपयांचा हप्ता मिळतो की नाही, यावर राज्यातील लाखो महिलांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!