सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यातील सावरी गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळील शेडमध्ये सुरू असलेल्या कथित ड्रग्स कारखान्यावर मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 45 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारपेठेतील किंमत अंदाजे 145 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, विरोधकांकडून सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत.
या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली.
सपकाळ म्हणाले, सावरी गावात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा कारखाना सुरू असताना सातारा पोलिसांना याची कल्पना नव्हती का, हा प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण दुर्लक्षित केले आणि अखेर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणात शिंदे आणि फडणवीस यांची मिलीभगत आहे का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
सपकाळ यांनी यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाचा उल्लेख करत सांगितले की, आंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या माता-भगिनींवर अमानुष लाठीहल्ला करणारे हेच पोलिस अधीक्षक होते. त्यामुळे सातारा ड्रग्स प्रकरणातही निष्पक्ष चौकशी होईल का, याबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ड्रग्सचा एवढा मोठा कारखाना उघडकीस येऊनही अद्याप खऱ्या सूत्रधारांवर कारवाई झालेली नाही, असा आरोप करत सपकाळ यांनी सांगितले की, सावरी गावाजवळच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे मूळ गाव आहे. त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्याशी या कारखान्याचे संबंध असल्याचे आरोप समोर येत असताना सरकार ठोस कारवाई करत नसल्यामुळे संशय अधिक बळावत आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच महानगरपालिका निवडणुकांची घाईघाईने घोषणा करण्यात आल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. त्यांनी सांगितले की, अद्याप मतदार याद्या जाहीर झालेल्या नाहीत. 15 तारखेला मतदार याद्या जाहीर होणार होत्या, मात्र आता त्या बुथनिहाय 27 तारखेला जाहीर करण्यात येणार आहेत. असे असताना 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी सुरू होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उमेदवारी अर्जात उमेदवार, सुचक व अनुमोदक यांना मतदार यादीतील भाग क्रमांक आणि अनुक्रमांक नमूद करावा लागतो, मात्र मतदार याद्याच उपलब्ध नसतील तर अर्ज कसे भरणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.