अक्कलकोट येथे महिला दिन उत्साहात : थोर सावित्री, जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी वाटचाल करावी – शितल म्हेत्रे
कुरनूर दि. ९ : आपण स्त्री म्हणून समाजामध्ये वावरत असताना स्वतःला कमी न लेखता धैर्याने पुढे जावे. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर या सारख्या अनेक मातांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा. या सर्व स्त्रीच होत्या. त्यांचे कार्य हे देशाला समाजाला दिशा देणार होतं. त्या पद्धतीने आपण देखील स्त्री म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी काम करायला हवे, असे प्रतिपादन अक्कलकोट महिला काँग्रेसच्या अध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी केले. अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन मंदिरात श्री वटवृक्ष अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदा स्वामी होत्या.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाल्या की ग्रामीण भागातील महिलांनी पुढे यावे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनची निर्मित झाली आहे. आणि महिलांच्या मदतीसाठी, हितासाठी सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशन सदैव तत्पर असेल यात काय शंका नाही असेही ते म्हणाले. श्री वटवृक्ष अकॅडमी तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रिती पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कि, आपल्या देशामध्ये समाजामध्ये महिला सुरक्षित नाहीत त्यासाठी शासनाने योग्य ते महिलांच्या बाबतीत पावले उचलून महिला कशा सुरक्षित राहतील याकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी हस्ताक्षर व कॅलिग्राफी क्लासेस चे उद्घाटन वीरशैव लिंगायत महिला मंडळाचे अध्यक्ष राजश्री कलशेट्टी यांनी केले. याप्रसंगी हस्ताक्षर बद्दल सतीश मर्जी यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मल्लम्मा पसारे, मेथें मॅडम, महानंदा उडचाण, प्रीती पाटील, कल्लूरकर मॅडम आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता जाधव तर स्वागत सागर धूनशट्टी यांनी केले. महेश शटगार यांनी आभार मानले.