काम करणाऱ्या माणसांना पुरस्काराच्या माध्यमातून ऊर्जा मिळते
गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
समाजात अनेक माणसे अशी असतात जी समोर येत नाहीत पण ती काम करत असतात.या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळते आफ्टरनून व्हाईस हे काम सातत्याने करीत आहे. त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे शिक्षण मंत्री डॉ.दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
शनिवारी सायंकाळी नरिमन पॉईंट (मुंबई ) येथील रंगस्वर सभागृहात महाराष्ट्रातील चाळीस दिग्गज मान्यवरांना महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
अतिशय दिमाखदार आणि शिस्तबद्ध पद्धतीने रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा समावेश होता.यावेळी मंत्री दीपक केसरकर,केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले,राहुल नार्वेकर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,ऍड. उज्वल निकम,भरत दाभोळकर, गौरी सावंत आदिं मान्यवरांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आफ्टरनून व्हाईसच्या संपादिका डॉ.वैदेही ताम्हन यांनी केले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचे खरे रत्न समोर आणले आहेत त्यांच्या कार्यातुन महाराष्ट्राची प्रगती होत आहे त्यांचे योगदान हे राज्यासाठी अतुलनीय आहे म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे गरजेची आहे, असे तमन यांनी सांगितले.पुरस्काराला उत्तर देताना औसेकर महाराज म्हणाले,एखाद्या वारकरी क्षेत्रातील पांडुरंगाची सेवा करणाऱ्या वारकऱ्याला महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरव करणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.पुरस्कार दिलेल्या प्रत्येक मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्रात अनेक बदल घडत आहेत त्यांच्या कार्याला बळ देण्यासाठी अशा पुरस्कारांची नक्कीच गरज आहे.ती आफ्टरनून व्हाईसच्या माध्यमातून डॉ.ताम्हन यांनी पूर्ण केली आहे,असे ते म्हणाले.पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दिलेल्या सर्व जबाबदार्याचे उत्कृष्ट कार्य आणि वारकरी सांप्रदयात दिलेल्या समर्पणाबद्दल औसेकर महाराजांचा सन्मान करण्यात आला.औसेकर महाराज यांना यापूर्वी पूणे येथे शांतिदूत परिवाराच्यावतीने महाराष्ट्र भूषण तर वारकरी संप्रदायातील मानाचा समजला जाणारा वारकरी पुरस्कार मिळाला आहे.तसेच
काशी पिठ, केदार पिठ, रंभापूरी पिठ, अक्कलकोट देवस्थान यांच्यावतीनेही त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता पाटील यांनी केले तर आभार डॉ.ताम्हन यांनी मानले. या कार्यक्रमाला चाकूर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष कपिल माकणे,ह भ.प
गोरखनाथ महाराज,ह.भ.प श्रीरंग महाराज औसेकर,गोविंद माकणे, मेघराज बरबडे, अशोक लालबुंद्रे,प्रा.प्रतिभा विश्वास,अमर पाटील आदिंसह महाराष्ट्र व देशभरातून विविध क्षेत्रातून मान्यवर व्यक्ती आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.