मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. त्यातच आजही कोकणासह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे पालघरमध्येही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने राज्यात आजही पावसाचा इशारा दिला आहे. रायगड आणि साताऱ्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर पुणे जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. वामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेश लगतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. या मुसळधार पावसाचा फटका सांगीलसह कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच काल धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
तर सांगली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी ही 40 फुटांवर गेली आहे. ही इशारा पातळी आहे. पावसाचा जोर वाढला तर या पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. अन्यथा 40 फुटाच्या आसपास पाणी पातळी स्थिर होण्याचा अंदाज आहे.