ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून हवामान खात्याने राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्या नगर, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर वाढला आहे.

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला असून विशेषतः पश्चिम उपनगरांमध्ये – अंधेरी, बोरिवली, मालाड, कांदिवली आणि वांद्रे परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. बेस्ट बस सेवा आणि लोकल सेवेवर ही परिणाम झाला असून नागरिकांनी प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आजच्या दिवशी कोकणासह घाटमाथ्याच्या भागातही मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी 60 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज ठेवले असून पूरप्रवण भागांतील नागरिकांना अलर्टवर ठेवले आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, नागपूर आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही भागांतील नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूणच, राज्यात मान्सून पुन्हा जोरात परतला असून गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, विजांच्या गडगडाट दरम्यान झाडांच्या खाली किंवा उघड्यावर थांबू नये आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 23 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट: हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!