अहिल्यानगर : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील भाजपचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांना नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊनही ते वादग्रस्त करत आहेत. गुरुवारी अहिल्यानगरमध्ये एमआयएमची भव्य सभा पार पडली. या सभेतून पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, माजी खासदार इम्तियाज जलील आणि पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी आक्रमक पद्धतीने भाषणे केले. भाषणात या नेत्यांनी मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
या टीकेचा समाचार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कालच पार पडलेल्या आक्रोश सभेतून घेतला. पण टीकेला प्रत्युत्तर देताना पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरली. ***च्यांनो तुम्ही राणे आणि जगतापपर्यंत जाण्याआधी थडग्यात जाल, त्यावर आमच्याकडून भगवा आणि निळा झेंडा रोवला जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
अहिल्यानगरमध्ये झालेल्या सभेत हिंदुत्त्वाचा कडवा पुरस्कार करणाऱ्या मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना डिवचण्यात आले होते. वारीस पठाण यांनी तर नितेश राणे यांना थेट आव्हान देत येशील दोन पायावर आणि जाशील स्ट्रेचरवर असे म्हटले होते. तर जलील यांनी नितेश राणेंचा ‘छोटासा चिंटू’तर संग्राम जगताप यांचा चिकनी चमेली उल्लेख केला होता.
पडळकर यांनी आपल्या भाषणात आमदार संग्राम जगताप हे जिहादींचे बाप असल्याचे म्हणत एमआयएमच्या नेत्यांना फटकारले. तसेच दुसऱ्या देशामध्ये असे चालते का?, भडव्यांनो भारतातील महामानवांविषयी चुकीचे वक्तव्य कराल तर आमचे तरुण ठोकून काढतील, असा थेट इशारा देत ठोकून काढण्याची भाषा त्यांनी केली.
नेमकं काय म्हणाले पडळकर?
***च्यांनो तुम्ही राणे आणि जगतापपर्यंत जाण्याआधी थडग्यात जाताल. तर त्यावर भगवा आणि निळा झेंडा रोवला जाईल. मुस्लिम हे हिंदू असून याबाबत जम्मू-काश्मीरचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद हे वारंवार सांगत आहेत. मात्र सध्याचे मुस्लिम कॉकटेल असल्याचेही अत्यंत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
अहमदनगरच्या नाव आता अहिल्यानगर झाले असून या शहराच्या नावावरून बराच मोठा वाद झाला होता. हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत पडळकर यांनी ज्या लोकांना शहराचे नामांतरण मान्य नाही त्यांच्यावर कारवाई करा, असे म्हटले आहे. तर ज्या ज्या ठिकाणी अहिल्यानगर ऐवजी अहमदनगर लिहिले असेल त्यांचे शॉपक्ट लायसन रद्द करा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.