सोलापूर : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या गणेश हेमंत जाधव (वय २७, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) या तरुणास विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जून २०१७ मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पिडीत अल्पवयीन मुलगी ही तिच्या नातेवाईकांच्या घरी आलेली होती. त्यावेळी आरोपी गणेश जाधवने पिडीतेला त्याच्या घरामध्ये बोलावून मागच्या खोलीत नेऊन मोबाईलवर घाणेरडे व्हिडीओ दाखविले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. पिडीता ही तिच्या घरी गेल्यानंतर सतत घाबरल्यासारखी रहात असल्यामुळे तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबतची माहिती आई-वडिलांना सांगितली.
पिडीतेच्या आईने चाईल्ड लाईन हेल्पलाईनच्या सदस्यांच्या मदतीने सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गंपले यांनी करून आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले होते. सुनावणीवेळी सरकार पक्षाच्यावतीने ८ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश कविता शिरभाते यांनी आरोपीस पोक्सो कलम ९ प्रमाणे दोषी धरून ५ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिने साध्या कैदेची शिक्षादेखील सुनावली. यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. शीतल डोके तर आरोपीच्यावतीने अॅड.ईस्माईल शेख यांनी काम पाहिले.