---Advertisement---

पुण्यात भाजप-काँग्रेस राडा: आंदोलनात दगडफेक, २ जखमी !

By team
On: February 15, 2026 1:43 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी स्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. भाजपने या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठवील आहे. या प्रकरणी पुण्यात त्यांच्याविरोधात एक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या विधानाविरोधात येथील काँग्रेस भवनासमोर आंदोलन सुरू केले होते. त्यांनी जवळपास दीड तास आंदोलन केले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचेही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अचानक दगडफेक झाली. त्यात एक महिला व पुरुष कार्यकर्ता जखमी झाला. त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होत होता. हे चित्र पाहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे एकच धावपळ उडाली. या राड्यात घटनास्थळी उभ्या असणाऱ्या काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. तसेच महिला पोलिसाही जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतला.

दुसरीकडे, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने काँग्रेस भवनावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. या बंदोबस्तातच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक केली. पण पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना अभय दिले. या घटनेत काही कारच्या काचाही फुटल्या आहेत. तसेच काँग्रेसची एक महिला कार्यकर्ती व कार्यकर्ताही जखमी झाला आहे. यावेळी काही पोलिसांनाही दगड लागलेत, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!