नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज देशभरात सर्वत्र गणेश विसर्जनाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असून पुढच्या वर्षी लवकर अस म्हणत आहेत. हैदराबाद येथील महागणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. देशातील सर्वांत उंच मूर्ती म्हणून या गणेश मुर्तीकडे पाहिले जाते. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची अलोट गर्दी झाली आहे.
हैदराबादच्या खैरताबादचा महागपती असं या गणपती म्हटलं जातं. या गणपती बाप्पाला गणपती ‘विश्वशांती महाशक्ती गणपती’ असं नाव देण्यात आलं आहे. या मूर्तीची उंची तब्बल ६९ फूट असून रुंदी २८ फूट आहे. ही गणपती मूर्तीचं दिव्य रुप डोळ्यात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी ८४ दिवसांचा कालावधी लागला आहे.
या वर्षीची थीम शांती मूर्ती अशी ठेवण्यात आली आहे. या महागणपतीमध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचे प्रतिबिंब दिसते. मूर्तीच्या डाव्या बाजूला जगन्नाथ, सुभद्रा आणि बलराम यांच्या मूर्ती आहेत, ज्या खूप आकर्षक दिसतात. तर उजव्या बाजूला लक्ष्मी आणि हरी क्रीड आहेत. या गणपतीला पाहण्यासाठी लांबून गणेश भक्त हैदराबादमध्ये दाखल होत असतात. यंदाही गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली आहे.