अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सर्व सेवेपेक्षा भारतीय सैन्य दलातील देशसेवा महत्त्वाची असून तरुणांनी या सेवेत स्वतःला झोकून देऊन काम करावे आणि देशातील जनतेची सेवा करावी, असे आवाहन मनीषा ऍग्रोचे सर्वेसर्वा तथा चपळगावचे माजी सरपंच उमेश पाटील यांनी केले.चपळगांवचे सुपुत्र यल्लाप्पा आनंद नारायणकर याची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवराज बाणेगाव हे होते.पुढे बोलताना पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील तरुण आजही मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. कधी त्यांच्या पदरी अपयश येते. कधी यश येते.ग्रामीण भागातील तरुण हा अतिशय चिकट आणि जिद्दी असतो.जोपर्यंत पोलीस भरती किंवा सैन्य भरती होत नाही. तोपर्यंत तो मेहनत किंवा जिद्द सोडत नाही. तशाच प्रकारचा प्रयत्न नारायणकर यांनी गावात केला आहे.त्याचे फळ त्यांना मिळाले आहे,असेही ते म्हणाले.बाणेगाव म्हणाले, आजच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची नोकरी जर लागायची असेल तर मोठा संघर्ष करावा लागत आहे.ज्याला नोकरी मिळाली तो नशीबवान समजला जात आहे.प्रयत्न केल्यास नक्की यश आपल्या पदरी पडते, असे ते म्हणाले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाले, महिबूब तांबोळी,आनंदराव नारायणकर,सुरेश सुरवसे,दिगंबर जगताप,मनोज इंगोले आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.