सातारा : जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील युवकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन लसीकरण करुन घ्यावे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे परंतु अद्यापपर्यंत दुसरा डोस घेतला नाही त्यांनी दुसरा डोस त्वरित घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आला. यावेळी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, महेश शिंदे, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, पालक सचिव ओमप्रकाश गुप्ता, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदी उपस्थित होते.
वाढती रुग्ण संख्या पाहता पुरेसा आरोग्य सोयी सुविधा तयार ठेवा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ज्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम सुरु आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. कोरोना संसर्गामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसांना 50 हजार सानुग्रह अनुदान दिले जाते या अनुदानापासून एकही कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. एकही रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवावी. शासनाने घातलेल्या निर्बंधांचे सर्व यंत्रणांनी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. जे निर्बंधांचे पालन करणार नाही अशा नागरिकांवर कारवाई करावी. सध्या जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन न जाता रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी शासनाने व प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
कोरोनासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीत दिली.