मुंबई : वृत्तसंस्था
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य युतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. युतीची चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी थेट अट घातल्याने या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती सरकारमधून बाहेर पडल्याशिवाय युती शक्य नसल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य युतीत ‘मिठाचा खडा’ पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीची युती झाली होती. मात्र, त्या युतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत दोन्ही गटांच्या नेतृत्वात प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी आमदार उत्तम जानकर यांच्या अटीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
उत्तम जानकर म्हणाले, “शरद पवारांचा विचार वेगळा आहे आणि अजित पवार सत्तेसोबत आहेत. त्यामुळे बिर्याणीत गुळवणी चालेल का, हा प्रश्न आहे. जर अजित पवारांना एकत्र यायचे असेल, तर त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे आणि शरद पवारांच्या विचाराने पुढे जावे.”
ते पुढे म्हणाले की, कोणताही पक्ष ठोस धोरण आणि विचारांशिवाय चालू शकत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार पुरोगामी असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अजित पवार गटातील नेते व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही युतीबाबत सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, “जिल्हा परिषद निवडणुकीत चिन्ह एकच असावे, ही ग्रामीण मतदारांची गरज आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवतील की नाही, याचा अंतिम निर्णय आमचे पक्षाध्यक्ष अजित पवार घेतील.” यामुळे आता सर्वांचे लक्ष अजित पवार काय निर्णय घेतात, याकडे लागले आहे.