ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची बदली; वारंवार बदल्यामुळे शहरातील विकास कामाचा खेळखंडोबा

 

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोटचे मुख्याधिकारी
गणेश शिंदे यांची श्रीरामपूरला बदली झाली आहे. तीन महिन्याच्या आतच शिंदे यांची बदली
झाल्याने अक्कलकोट शहरामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोट नगरपालिकेत कायम अधिकाऱ्यांच्या बदल्या चालल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. वारंवार अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे अक्कलकोटच्या विकासकामांवर परिणाम होत आहे परिणामी विकासाचा खेळखंडोबा झाल्याचे जनतेतून बोलले जात आहे.प्रारंभी दोन वर्षापूर्वी डॉ. प्रदीप ठेंगल हे पूर्णवेळ मुख्याधिकारी होते. त्यावेळी अक्कलकोटच्या अनेक कामांना गती प्राप्त झाली होती. त्यानंतर पुण्याहून खास आशा राऊत या अक्कलकोटला मुख्याधिकारी म्हणून आल्या होत्या. त्यांनीदेखील अक्कलकोटच्या कर्मचाऱ्यांना वेगळी शिस्त लावत कोरोना संकटांमध्ये मुख्य भूमिका बजावत विकासात मोलाचे योगदान दिले होते. त्यांचीही पुण्याला अचानक बदली झाल्याने अक्कलकोटकरांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. यानंतर त्यांच्या जागी गणेश शिंदे यांची नियुक्ती झाली होती पण ते देखील फक्त तीन महिन्यात राहू शकले.पुन्हा त्यांची बदली झाली आहे. त्यांनी काल अक्कलकोट नगरपालिकेचा पदभार सोडला आहे. आता अक्कलकोट नगरपालिकेत सध्या मुख्याधिकारी पद रिक्त आहे. मधल्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे अक्कलकोट शहरातील विकास कामे रखडली आहेत. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत.यापूर्वीचे मुख्याधिकारी
हे कर्तव्यदक्ष होते. बर्‍यापैकी नागरिकांची कामे होत होती परंतु अचानक त्यांच्या बदल्या झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अक्कलकोटमध्ये चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती का होत नाही आणि झाली तरी ते अधिकारी का शहरांमध्ये राहायला तयार होत नाहीत, हा खरा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आता पुन्हा नवे अधिकारी कोण येणार याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. याकडे वरिष्ठ पातळीवरून देखील विचार होण्याची आवश्यकता आहे. तसे पाहिले तर अक्कलकोट शहर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे या ठिकाणची ध्येयधोरणे, विकास आराखडा निश्चित करून चांगल्या सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करून शहराचा कायापालट होणे गरजेचे आहे परंतु अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने शहराच्या विकास कामाचा चांगलाच खेळखंडोबा झाला आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने यामध्ये लक्ष घालून चांगले अधिकारी आणावेत,अशी मागणी जनतेतून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!