मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी) ने आज त्यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी धाड टाकली आहे. समीर खान यांच्या घरात एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
ब्रिटिश नागरिक असलेला ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार करण सजनानी आणि समीर खान या दोघांमध्ये ड्रग्जबाबत झालेले चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे सापडले आहेत. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पे द्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे.
मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु असताना हा व्यवहार समोर आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. या प्रकरणी काल (बुधवार) सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. संध्याकाळी समीर खान यांना एनसीबीने अटक केली.