---Advertisement---

पंखात बळ दिले आहे जिंकण्याची जिद्द ठेवा ; मुख्यमंत्री ठाकरेंचा छात्रसैनिकांना मंत्र

On: January 14, 2021 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई :- तुमच्या पंखांमध्ये शिक्षक, मार्गदर्शकांनी बळ दिले आहे. आता जिंकण्याची जिद्द ठेऊन भरारी घ्या, असे आवाहन करतानाचा विजयी भव: चा मंत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांना दिला.

भारताच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावरील ध्वजसंचलनामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. दुरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी दिल्ली येथे शिबीरात सहभागी छात्रसैनिकांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रसैनिकातूनच पुढे काही देशाच्या रक्षणासाठी सज्ज होतात. तेव्हा मात्र ज्यांना तीळगुळाची भाषा समजत नाही त्यांना सडेतोड भाषेत उत्तर द्यावे लागेल. आणि हे माझ्या छात्रसैनिकांनी नक्कीच माहित आहे. भारतात सैनिकी शिक्षण सक्तीचे नाही. तरीही राष्ट्रीय छात्र सेना हे जगातील एक मोठे छात्रसेना संघटन आहे. कित्येकदा आपल्या पाल्यांने मात्र नीटनेटके आणि चाकेरीबद्ध आयुष्य जगावे, असे अनेक पालकांना वाटते. अशा परिस्थितीतही आपल्या पाल्यांना छात्र सेनेत सहभागी होण्याच्या स्वप्नांना बळ देणाऱ्यां पालकांना मुजरा करतो.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात तुम्हाला संपूर्ण जग बघणार आहे. तेव्हा आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक यावा, याच जिद्दीने तुम्ही पाऊल टाकावे. प्रतिवर्षीप्रमाणे दिल्ली गाजवून विजयी भव: असा मंत्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी छात्रसैनिकांना दिला.

दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्रसेनेचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, संचालक श्री. सतपाल सिंह आणि दिल्ली येथे प्रशिक्षण शिबीरातील राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!