ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आमदारांपुढे आव्हान

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी लाखोंच्या ऑफर्स जाहीर केल्या होत्या. मात्र, आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आव्हान आमदारांपुढे आहे.

पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी पहिल्यांदा ऑफर्स देऊ केल्या आहेत. त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी 25 लाख रुपये घेऊन जा’ असे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी अशाच लाखोंच्या ऑफर्स देऊ केल्या आहेत. मात्र आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आव्हान आमदारांपुढे आहे.

परभणी जिल्ह्यात तर अक्षरशः चढाओढ लागली होती. 4 विधानसभापैकी 3 विधानसभा मतदार संघातील आमदारांनी प्रत्येकी 25 लाखांचा निधी देण्याचं जाहीर केलं. या अनुषंगाने परभणीत 9, जिंतुर 21 आणि गंगाखेडमध्ये 25 ग्रामपंचायत बिनविरोध आल्या आहेत. आता या एकुण 55 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 25 लाखांचा निधी कसा द्यायचा आणि आपल्या मतदार संघात किती निधी वापरायचा हे आव्हान परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, जिंतुरच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या समोर असणार आहे.

पारनेरमधील जवळपास 30 ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या एका भन्नाट आवाहनाला मोठे यश मिळताना दिसत आहे. कारण पारनेर तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावागावात वाद-विवाद, भांडण होऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी नामी शक्कल लढवली. “ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी 25 लाख रुपये घेऊन जा” असे लंके यांनी आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील जवळपास 30 गावातील ग्रामपंचायतने बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!