राज्यातील पाच हजार ग्रामपंचायतींसह 27 जिल्हा परिषदा, 20 महापालिका, 300 नगरपालिका, 325 पं.स.च्या निवडणूका होणार
सोलापूर : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच झाल्या. या निवडणुका १६ जानेवारी पार पडल्या तर १८ जानेवारी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. दरम्यान, यानंतर आता 1 एप्रिल 2021 ते 30 मार्च 2022 या वर्षात राज्यातील पाच हजार ग्रामपंचायतींसह 27 जिल्हा परिषदा, 20 महापालिका, 300 नगरपालिका तथा नगरपंचायती आणि 325 पंचायत समितींच्या निवडणूका होणार आहेत. ग्राम विकास विभागाने या काळात मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची यादी तयार केली असून निवडणूक आयोगालाही सादर केल्याचे ग्रामविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक फटका शिवसेनेला बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा विस्तार होणार नाही, याची खबरदारी घेत महाविकास आघाडी आता स्वबळावर लढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई, सोलापूर, पिंपरी चिंचवड यासह राज्यातील मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या महापालिका, जिल्हा परिषदांसह नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका आगामी वर्षात होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांना व विद्यमान आमदार, खासदारांच्या प्रतिष्ठेच्या या निवडणुका असणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर 2021 मध्ये लागेल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.