नागपूर :नागपूर पदवीधर मतदारसंघात 322 मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
महाराष्ट्रात सर्वच विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला चांगलं समर्थन मिळालं आहे. त्यामुळे निकालानंतर चांगलं यश प्राप्त होण्याचा आम्हाला विश्वास आहे. विधानपरिषद निवडणुकांच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं, पण त्याच्यावर परिणाम नक्कीच पाहायला मिळेल” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
“सुशिक्षित सुजाण मतदारांनी लोकशाही मजबूत केली पाहिजे. त्यामुळे नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा” असं आवाहन फडणवीसांनी केलं. तुमच्या घरचीच तीन नावं मतदार यादीत नाहीत, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, की “इतकी अचानक निवडणूक घोषित झाली. मतदार याद्यांमध्ये घोळ दिसत आहे. बरीच नावं सापडलेली नाहीत.
बऱ्याच घरांमध्ये फॉर्म सर्वांनी भरले, पण दोघांचे नाव यादीत आहे, दोघांचे नाव नाही, असे आढळले. निवडणूक आयोगाला यंत्रणेत सुधारणा करावी लागेल. फॉर्म परिपूर्ण भरण्याची जबाबदारी आम्ही घेतली, निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव येण्याची जबाबदारी घ्यावी” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.