अक्कलकोट, दि.४ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट शहरामध्ये पुन्हा एकदा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आज एकूण २१८ जणांची तपासणी करण्यात आली. एमएसईबी बायपास चौकापासून याची सुरुवात करण्यात आली. मध्यंतरी कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले होते.
आता अक्कलकोट शहर आणि तालुक्यात पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. केवळ अक्कलकोटच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात याची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात अशा प्रकारचे आदेश दिले आहेत .त्यानुसार मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे पथक तैनात करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेला गती प्राप्त झाली आहे.
विना मास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही आणि यात जर संशयित रुग्ण कोणी दिसला तर त्यांचीही तात्काळ आरटीपीसीआर आणि रॅपिड टेस्ट केली जाईल आणि आरोग्य विभागाकडे त्याला वर्ग केले जाईल, असे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले. आज तपासणी केलेल्या २१८ जणांमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नाही, असे ते म्हणाले.
यावेळी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार,नगरपरिषदेचे पक्षनेते महेश हिंडोळे, महावितरणचे उप अभियंता म्हेत्रे, विठ्ठल तेली यांच्यासह अक्कलकोट नगरपालिकेचे कर्मचारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
★ नगरपालिका प्रशासन मदत करेल
प्रशासनाने कोरोनाच्या संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याला जनतेची साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. ज्यांना कुणाला लक्षणे असतील त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करावा. त्यासाठी अक्कलकोट नगरपरिषद मदत करेल – सचिन पाटील,मुख्याधिकारी










