अक्कलकोट दि,४- सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के नुकसानभरपाई देण्याची मागणी सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने स्वामींनाथ हरवाळकर यांनी आज राज्य सरकारकडे केली.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ७० हजार ९०३ हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा जबरदस्त तडाखा बसला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ९७ हजार ६३४ शेतकरी बाधित झाले असून या पावसाचा सर्वाधिक फटका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ ,अक्कलकोट, बार्शी आणि माढा या सहा तालुक्यांना बसला आहे. सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला. अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली, तर सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आजही पाण्यात आहेत. तर काही शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. जिल्ह्यातील जी ३२२ गावे मुसळधार पावसामुळे बाधित झाली त्यामध्ये बार्शी १३७, माढा ३७, मोहोळ ४८, अक्कलकोट १२, दक्षिण सोलापूर ४७ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ४१ गावांचा समावेश आहे. यामध्ये सुमारे १६ हजार १७८ हेक्टर बागायती क्षेत्राला तसंच ५१ हजार १९०.२ हेक्टर जिरायत क्षेत्राला जबरदस्त झटका बसला आहे. तसंच सुमारे ३ हजार ५३५ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना नुकसानीचा फटका बसला आहे.त्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट शंभर टक्के नुकसानभरपाई देण्याची मागणी आज लेखी निवेदनाद्वारे शेतकरी नेते स्वामींनाथ हरवाळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
त्याच बरोबर सोमवार आठवडी बाजार नियमित कांदा बाजार येथे सुरू करावे,अक्कलकोट नगर पालिका पाणी पुरवठा शासनाने ताब्यात घेऊन एकदिवसाआड पाणीपुरवठा करावी आदि महत्वाच्या मागण्याचे निवेदन तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांच्यामार्फत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
या वेळी बोलताना स्वामींनाथ हरवाळकर म्हणाले,अक्कलकोट शहरासाठी चार-चार योजना कार्यार्न्वित असताना भ्रष्टाचार आणि निकृष्ठ कामामुळे चारही योजना बंद पडल्या आहेत.अक्कलकोटकर गेली तीस वर्षे पाण्याचा दुष्काळ सहन करीत आहेत.आठवढ्याला अनियमित पाणी देऊन महिन्याला बिल घेणारी अक्कलकोट नगरपालिकेचे काम राज्यात आदर्श आहे,असा टोमणा त्यांनी मारला. अक्कलकोटच्या पाणी पुरवठा योजनांच्या भ्रष्टाचाराच्या सीआयडी चौकशी साठी मुंबई उच्च न्यायालयात निवडणुकीपूर्वी जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी शंकर पाटील,कोंडाजी जमादार,नागनाथ सुरवसे,गेनसिद्ध बागलकोट,चंद्रकांत अर्जुनगी,राजकुमार टेंगळे, गुरू शाखापुरे, रामबाई नागुरे,रामा बालशंकर, लादेन बागवान,जब्बार बागवान, अकिल हुंडेकरी, महिबूब बागवान आदि शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.