धोत्रीच्या गोकुळ शुगरकडून यंदा ६ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट , कारखान्याचा ७ वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात
अक्कलकोट, दि.१० : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखाना आता सर्व अडचणींवर मात करीत गाळपासाठी सज्ज झाला असून यावर्षी कारखान्याने ६ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. रविवारी, कारखाना कार्यस्थळावर गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचा ७ वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदानी व कारखान्याचे संचालक गणपतभाऊ शिंदे यांच्या हस्ते विधिवत बॉयलरचे पूजन करून हा सोहळा पार पडला.यावेळी बोलताना दत्ता शिंदे म्हणाले,भगवानभाऊ शिंदे यांच्या निधनाने शिंदे परिवाराची खूप मोठी हानी झाली आहे आमच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्याचा कारखान्यावर देखील मोठा परिणाम झाला.या सर्व परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने खूप मोलाचे सहकार्य केले असून
हे सहकार्य मी विसरू शकणार नाही, असे ते म्हणाले.
६ लाख मेट्रिक टन गाळपाच्या उद्दिष्टासाठी शेती विभाग सज्ज आहे त्यासाठी लागणारी वाहन यंत्रणा देखील कार्यरत आहे. या भागातील शेतकरी हा मोठा झाला पाहिजे ,यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. मागच्या वेळी बिल देण्यास थोडा विलंब झाला पण दिले. यावर्षी देखील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न आमचा राहील. कारखान्याचा सर्व स्टाफ, अधिकारी आणि कर्मचारी हे मन लावून काम करत आहेत. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम देखील यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन मोदानी यांनीही दत्ता शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर बाळासाहेब कुटे यांनी केले. यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे, संचालक विशाल शिंदे, कार्तिक पाटील, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक विश्वासराव शिंदे, उस्मानाबाद जिल्हा शिवसेना गटप्रमुख अनिल खोचरे, विमानतळ प्राधिकरणाचे सज्जन निचळ, सागर संतानी, प्रदीप गायकवाड आदींसह कारखान्याच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच धोत्री परिसरातील सरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, पोलीस पाटील ग्रामसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन शेती अधिकारी शिरसागर यांनी मानले.
ऊस देऊन सहकार्य करावे
धोत्री येथील गोकुळ शुगर कारखाना हा अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा असून आतापर्यंत कारखान्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे.शेतकऱ्यांनी देखील ऊस देऊन सहकार्य करावे.चांगला भाव देण्याचा आमचा प्रयत्न आम्ही नक्की करू – दत्ता शिंदे, चेअरमन गोकुळ शुगर