सेवापुस्तक वेतनपडताळणी मधील अडसर दूर करण्याची शिक्षक समितीची मागणी ;३ फेब्रुवारी बैठकीत होणार निर्णय
सोलापूर: सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन प्रस्ताव सादर करण्यापूर्वी वेतननिश्चितीची वेतन पडताळणी करणे अनिवार्य आहे.निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन प्रस्ताव वेळेत व तातडीने मंजूर होण्यासाठी वेतन पडताळणीसाठी होणारा विलंब दूर करण्यात यावा अशी मागणी जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली.
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,पदवीधर पदोन्नती तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरी आदेश व इतर अनुषंगिक आदेशाची मागणी करुन वेतन पडताळणीसाठी सादर केलेली बहुतांश सेवापुस्तक त्रुटी लावून परत पाठविण्यात आल्याने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून तातडीने वेतननिश्चितीच्या पडताळणी मधील अडसर व विलंब दूर करण्याची मागणी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली.यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी दि. ३ फेब्रुवारी रोजी शिक्षक समिती पदाधिकारी व संबंधित विभागातील कार्यालयीन अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत या प्रश्नी ठोस तोडगा काढण्याची ग्वाही दिली.
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरी आदेश व इतर अनुषंगिक आदेश जिल्हा परिषदेने संबंधित कर्मचाऱ्यांना न देता थेट पंचायत समितीला दिलेले आहेत.सदरचे एकत्रित आदेश संबंधित कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे . मात्र हे आदेश सादर करण्याची मागणी केली जात आहे . सदरच्या त्रुटीबाबत अर्थ विभाग आणि शिक्षण विभाग यांनी समन्वयातून मार्ग काढण्याची मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल कादे, जिल्हा नेते विकास उकीरडे, सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी, शिक्षक नेते सुरेश पवार,राजन ढवण, सर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धाराम माशाळे, दयानंद चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.